करोना विषाणूमुळे टोक्यो ऑलिम्पिकसाठीच्या अनेक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाचा कालावधी वाढवायला हवा, अशी मागणी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी केली आहे.

लिंगशुई चीन मास्टर्स (२५ फेब्रुवारी ते १ मार्च), व्हिएतनाम चॅलेंज (२४ ते २९ मार्च), जर्मन खुली (३ ते ८ मार्च) आणि पोलंड खुली (२६ ते २९ मार्च) या चार ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा करोनाच्या धास्तीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

‘‘करोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे बीडब्ल्यूएफने पात्रता स्पर्धाचा कालावधी पुढे वाढवावा. अनेक खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये,’’ असे सायनाने सांगितले.