रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले ते महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने. पदक जिंकल्यावर तिच्यावर बक्षिसांचा वर्षांव झाला असला तरी आता प्रचंड दडपण वाढले असल्याची भावना तिने जेएसडब्ल्यूतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केली.

‘‘आता माझ्यावर प्रचंड दडपण वाढले आहे. जवळपास दुप्पट किंवा तिप्पट अधिक दडपण माझ्यावर आहे, पण या दडपणावर मी मात करेन, असा मला विश्वास आहे. २०२० साली टोकियोमध्ये होणारे ऑलिम्पिक माझ्यासाठी महत्त्वाचे असेल,’’ असे साक्षी म्हणाली.

ऑलिम्पिकमध्ये साक्षीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता; पण साक्षीला पराभूत करणारी रशियाची व्हॅलेरिया कोब्लोव्हा अंतिम फेरीत पोहोचली आणि त्यामुळे रेपिकेज नियमांनुसार साक्षीला कांस्यपदक पटकावण्याची संधी मिळाली. त्यानंतर मंगोलिया आणि किर्गीस्तानच्या कुस्तीपटूंचा पराभव करत साक्षीने कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

भारतातील महिला कुस्तीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सकारात्मक बदल झाले असल्याचे साक्षी सांगते. याबाबत ती म्हणाली की, ‘‘दिल्लीमध्ये २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. या स्पर्धेमध्ये बऱ्याच मुली कुस्तीकडे वळल्या आहेत. जेव्हा मी कुस्ती खेळायला सुरुवात केली, तेव्हा फक्त ५-६ मुली कुस्ती खेळत होत्या, पण या संख्येमध्ये सध्या चांगली वाढ झाली आहे.’’

दडपणामुळे ऑलिम्पिकमध्ये अपयश -विकास कृष्णन

ऑलिम्पिकमध्ये माझ्यावर भरपूर दडपण होते आणि त्यामुळेच माझ्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्न मी पाहिले आहे, पण रिओमध्ये पदक मिळवू न शकल्याने मी निराश आहे, असे मत बॉक्सिंगपटू विकास कृष्णनने या वेळी व्यक्त केले.