विविध उपाययोजना करूनही गेल्या चार वर्षांमध्ये उत्तेजकप्रकरणी दोषी असणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत भारताचे ३७९ खेळाडू याबाबत दोषी आढळले आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी राज्यसभेत एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) दिलेल्या माहितीच्या आधारे हे उत्तर त्यांनी दिले आहे. २०१३ मध्ये ९६ खेळाडू, २०१४ मध्ये ९५ खेळाडू, तर २०१५ मध्ये १२० खेळाडूंवर उत्तेजकप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबपर्यंत ६८ खेळाडू दोषी आढळले आहेत.

doping1-chart

याबाबत गोयल म्हणाले की, ‘‘२०११ मध्ये राष्ट्रीय क्रीडा विकास नियमावली अमलात आणण्यात आली होती. त्यानुसार विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना उत्तेजक प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समिती (वाडा) या संस्थेशी नाडा ही संस्था संलग्न असून वाडा संस्थेच्या विविध नियमांची अंमलबजावणी नाडा संस्थेतर्फे आपल्या देशात केली जात असते. दोषी खेळाडूंवर बंदी व आर्थिक दंडाची कारवाई केली जात असते.’’