X

कुलदीपच्या फिरकीत कांगारू गारद; मालिका बरोबरीत सोडवण्यात भारत ‘अ’ संघाला यश

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा विकेट राखून विजय

भारत ‘अ’ संघाने चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर सहा विकेट राखून विजय मिळवला. भारतीय फिरकीपटूंनी दुसऱ्या डावातही सुरेख गोलंदाजी केली. या विजयाबरोबरच दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखण्यात भारताला यश आले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेले ५५ धावांचे आव्हान भारताने चार फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

सोमवारच्या २ बाद ३८ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. तिसऱ्या विकेटसाठी हेड व हँड्सकॉम्ब यांनी ७९ धावांची भागीदारी रचत सामन्यात अनिर्णीत राखण्याच्या दिशेने कूच केली. मात्र प्रथम शाहबाज नदीमने हेडला (४७) व कुलदीप यादवने हँड्सकॉम्बला (५६) धावांवर बाद करत सामन्यात चुरस निर्माण केली. कृष्णप्पा गौथमनेही कर्णधार मिशेल मार्शला (३६) त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पुढे नदीम, गौथम व कुलदीप यांनी शेपटाला झटपट गुंडाळत ऑस्ट्रेलियाचा डाव २१३ धावांवर संपुष्टात आणला. भारतातर्फे कुलदीपने तीन व गौथम,नदीमने प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया ‘अ’ (दुसरा डाव) : १०२.५ षटकांत सर्वबाद २१३ (पीट हँड्सकॉम्ब ५६, ट्रेविस हेड ४७; कुलदीप यादव ३/४६).

भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ६.२ षटकांत ४ बाद ५५ (अंकित बावणे २८; मायकेल नेसेर २/२६).