भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा ऐतिहासीक कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये संपला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर भारताने नवख्या अफगाणिस्तानवर एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवत, कसोटी क्रिकेटमध्ये आपण सर्वोत्तम संघ का आहोत हे दाखवून दिलं. फलंदाजीत शिखर धवन आणि मुरली विजयचं शतक, त्याला लोकेश राहुलने दिलेली साथ; तर गोलंदाजीत रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानच्या संघाने अक्षरशः नांगी टाकली. या ऐतिहासीक कसोटीत तब्बल १३ विक्रमांची नोंद झाली.

१ – एखादा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे.

१ – पदार्पणाच्या कसोटीत एका डावात १५० पेक्षा जास्त धावा देणारा राशिद खान पहिला गोलंदाज ठरला आहे.

३ – भारत व झिम्बाब्वे पाठोपाठ एका दिवसांत दोनवेळा सर्वबाद होणारा अफगाणिस्तान तिसरा संघ ठरला आहे.

४ – वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड यांच्यापाठोपाठ पदार्पणाच्या कसोटीत फॉलोऑन स्विकारणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला आहे.

२४ – भारतात एकाच दिवशी सर्वाधिक बळी जाण्याचा विक्रमही कालच्या दिवशी नोंदवला गेला. दुसऱ्या दिवशी तब्बल २४ फलंदाज माघारी परतले. याआधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत सामन्यात, २००४ साली मुंबईत २० फलंदाज एकाच दिवसात माघारी परतले होते.

२४ – दुसऱ्या दिवशी पडलेले २४ बळी हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. याआधी १८९८ आणि १९०२ साली कसोटी सामन्यात अनुक्रमे दुसऱ्या दिवशी २७ व २५ फलंदाज माघारी परतले होते.

२७.५ – पहिल्या डावात अफगाणिस्तानच्या संघाने अवघी २७.५ षटकं खेळून काढली. पदार्पणाच्या कसोटीत सर्वात कमी षटकांमध्ये बाद होण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर जमा झाला आहे. याआधी १९३० साली इंग्लंडविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात ४७.१ षटकात सर्वबाद झाला होता.

३७ – उमेश यादवने आपल्या ३७ व्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीचा शंभरावा बळी घेतला. याआधी शंभर बळी घेण्यासाठी जास्तीत जास्त कसोटी सामन्यांचा वेळ घेण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर जमा आहे. शास्त्रींनी आपल्या ४४ व्या कसोटी सामन्यात शंभरावा बळी टिपला होता.

१०९ – पहिल्या डावात अफगाणिस्तानच्या संघाने १०९ धावांपर्यंत मजल मारली. पदार्पणाच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्या केलेल्यांच्या यादीत अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावातील ८४ धावसंख्येसह प्रथम स्थानावर आहे.

३१६ – सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्यांच्या यादीत रविचंद्रन आश्विनने भारताच्या झहीर खानला मागे टाकलं. या यादीत आश्विनच्या पुढे आता अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंह हे खेळाडू आहेत.

३६५ – पहिल्या डावात ५०० धावा न करता सर्वाधिक धावांची आघाडी घेण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर जमा झाला आहे. काल भारताने पहिल्या डावानंतर ३६५ धावांची आघाडी घेतली होती.

३९९ – कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी ३९९ चेंडू फेकले. ४०० पेक्षा कमी चेंडू टाकून कसोटी सामना जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे.

४७४ – पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर जमा झाला आहे. याआधी बांगलादेशने २००० साली ढाका कसोटीत भारताविरुद्ध ४२९ धावा दिल्या होत्या.

याचसोबत अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय हा भारताच्या कसोटी इतिहासात सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी २००७ साली बांगलादेशवर भारताने एक डाव २३९ धावांनी विजय मिळवला होता. याचसोबत उमेश यादवही कालच्या सामन्यात १०० बळी घेणारा भारताचा सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे.