आयसीसीकडून कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची, कसोटी क्रिकेटमधली सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताने अफगाणिस्तानवर १ डाव २६२ धावांनी विजय मिळवला. अवघ्या दोन दिवसांत या सामन्याचा निकाल लागल्यामुळे हा विजय भारताचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. पहिल्या डावात सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ४७४ धावांपर्यंत मजल मारली.

भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात पुरता कोलमडला. मोहम्मद नाबीचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत गेल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ मोठी भागीदारी उभारु शकला नाही. पहिल्या डावात भारताकडून रविचंद्रन आश्विनने ४ इशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ बळी घेतले. पहिल्या डावानंतर भारताने अफगाणिस्तानच्या संघाला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावात अफगाणिस्तानचे फलंदाज संयमी खेळी करतील अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय माऱ्यासमोर या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. पहिल्या डावाची पुनरावृत्ती होतं अफगाणिस्तानचा दुसरा डावही कोलमडला. आघाडीच्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर मोठी भागीदारी उभारु शकला नाही. मधल्या फळीत हशिमतुल्ला शहिदी आणि कर्णधार अझगर स्टॅनिकझाईने थोडाफार प्रतिकार करत भारतीय आक्रमणाचा नेटाने सामना केला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. रविंद्र जाडेजाने दुसऱ्या डावात ४ तर उमेश यादवने ३ बळी घेतले. पहिल्या डावातील शतकासाठी शिखर धवनला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

  • एक डाव २६२ धावांनी भारत सामन्यात विजय
  • अफगाणिस्तानचा अखेरचा खेळाडू माघारी, भारत सामन्यात डावाने विजयी
  • मुजीब उर रेहमान माघारी, नववा गडी तंबूत परतला
  • अफगाणिस्तानला आठवा धक्का, यामिन अहमदझाई माघारी
  • भारत विजयापासून ३ विकेट दूर
  • राशिद खान रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, अफगाणिस्तानचे सात गडी माघारी
  • अफजर झजाई जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, अफगाणिस्तानचा सहावा गडी माघारी
  • जाडेजाच्या गोलंदाजीवर शिखर धवनने पकडला झेल
  • अखेर अफगाणिस्तानची जोडी भारताने फोडली, कर्णधार स्टॅनिकझाई माघारी
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी
  • कर्णधार स्टॅनिकझाई आणि हशमतुल्ला शहीदी यांच्याकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • रेहमत शाह इशांत शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद, अफगाणिस्तानचा चौथा गडी माघारी
  • पाठोपाठ मोहम्मद नाबी यादवच्या गोलंदाजीवर पायचीत, ३ गडी माघारी
  • अफगाणिस्तानचे २ गडी बाद
  • ठराविक अंतराने जावेद अहमदी उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद
  • उमेश यादवच्या गोलंदाजीवर मोहम्मद शेहजाद माघारी, अफगाणिस्तानला पहिला धक्का
  • दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची खराब सुरुवात
  • पहिल्या डावात पाहुण्या अफगाणिस्तानच्या संघाची १०९ धावांपर्यंत मजल
  • मुजीब उर रेहमानला माघारी धाडत रविंद्र जाडेजाने अफगाणिस्तानचा डाव संपवला
  • अफगाणिस्तानने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • तळातल्या फलंदाजांकडून भारतीय आक्रमणासमोर बचावाचा प्रयत्न
  • मोहम्मद नाबी आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी, अफगाणिस्तानला नववा धक्का
  • अफगाणिस्तानचे ८ गडी माघारी
  • ठराविक अंतराने रविचंद्रन आश्विनने यामिन अहमदजाईचा अडसर दूर केला
  • जाडेजाच्या गोलंदाजीवर राशिद खान माघारी, अफगाणिस्तानला सातवा धक्का
  • राशिद खान – मोहम्मद नाबीकडून अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • हशिमतुल्ला शहीदी रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी, अफगाणिस्तानला सहावा धक्का
  • अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी
  • रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर अफगाण कर्णधार स्टॅनिकझाई त्रिफळाचीत
  • अफगाणिस्तानने गाठला ५० धावांचा टप्पा
  • इशांत शर्माच्या गोलंदाजीवरअफसरचा त्रिफळा, अफगाणिस्तानला चौथा धक्का
  • उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेहमत शाह माघारी, अफगाणिस्तानचा तिसरा गडी माघारी
  • असफ – रेहमत शाह जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • इशांत शर्माच्या गोलंदाजीवर जावेद अहमदी त्रिफळाचीत, अफगाणिस्तानला दुसरा धक्का
  • हार्दिक पांड्याच्या अचूक फेकीवर अहमद शेहजाद माघारी, अफगाणिस्तानला पहिला धक्का
  • अफगाणिस्तानकडून डावाची सावध सुरुवात
  • पहिल्या डावात भारताची ४७४ धावांपर्यंत मजल
  • इशांत शर्मा राशिद खानच्या गोलंदाजीवर माघारी, भारताचा डाव आटोपला
  • वफादारच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या माघारी, भारताचा नववा गडी बाद
  • मोहम्मद नाबीच्या गोलंदाजीवर झाला बाद, भारताला आठवा धक्का
  • भारताची जमलेली जोडी फोडली, रविंद्र जाडेजा माघारी
  • हार्दिक पांड्याचं अर्धशतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • जाडेजा-पांड्या जोडीने संघाचा डाव सावरला
  • भारताने ओलांडला ४०० धावांचा टप्पा
  • यामिनच्या गोलंदाजीवर आश्विन माघारी, भारताचा सातवा गडी माघारी
  • रविचंद्रन आश्विन – हार्दिक पांड्या जोडीकडून डावाची सावध सुरुवात