भारत विरुद्ध अफगाणिस्तान या एकमेव कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. हा सामना अफगाणिस्तानच्या संघासाठी खास आहे. अफगाणिस्तान संघाला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा त्यांचा पहिलावहिला कसोटी सामना आहे. त्यामुळे त्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आणि विशेष आहे. मात्र त्या बरोबरच हा सामना भारताच्या एका खेळाडूसाठीही खास ठरला आहे. इतकेच नव्हे तर या सामन्याच्या माध्यमातून या खेळाडूचा एक अजब विक्रम झाला आहे.

हा खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक. भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक हा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळत असून त्याने पहिल्या डावात केवळ ४ धावा केल्या. मात्र असे असले तरीही दिनेश कार्तिकच्या नावे एक अजब विक्रमाची नोंद झाली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मधील सर्वाधिक अंतर असलेला तो भारतीय खेळाडू ठरला आहे.

३३ वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०१०मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला अखेर आज कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान भारताने तब्बल ८७ कसोटी सामने खेळले असून त्यात दिनेश कार्तिकला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ८७ सामन्यांचे अंतर राखून हा अजब विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. या यादीत यष्टीरक्षक पार्थिव पटेल याचा दुसरा क्रमांक असून त्याने दोन सामन्यांदरम्यान तब्बल ८३ सामने खेळण्याची संधी गमावली आहे. तर ५६ सामन्यांच्या अंतरासह अभिनव मुकुंद हा या यादीत तिसरा आहे.