भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून अॅडलेडच्या मैदानावर सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाने याआधीच संघाची घोषणा केली आहे.

दरम्यान नाणेफेक जिंकल्यामुळे भारतीय संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे…त्यावेळी भारताने २१ वेळा सामने जिंकले असून ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

दरम्यान पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने विशेष सुट्टी मंजूर केली आहे.