भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याला वादाची किनार लागली आहे. फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. नाबाद ४४ धावांची खेळी करत जाडेजाने भारतीय संघाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका निभावली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यास मान्यता दिली.

परंतू ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने याला आक्षेप घेतला. सामन्यादरम्यान लँगर डेव्हिड बून यांच्याशी वाद घालत असताना मैदानात दिसला. त्यामुळे जाडेजाच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या चहलला गोलंदाजीची संधी कशी मिळाली यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये गोंधळ पहायला मिळाला.

जाणून घ्या Concussion substitute बद्दल ICC चा नियम काय सांगतो??

एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्यावर मार लागला असेल तर सामनाधिकारी त्या संघाची बदली खेळाडूची विनंती मान्य करु शकतात. पण त्या खेळाडूचा समावेश केल्यामुळे संघाला अतिरिक्त फायदा होणार नाही याची काळजी घेऊनच सामनाधिकारी हा निर्णय घेऊ शकतात. तसेच हा समावेश करताना दुखापतग्रस्त खेळाडू उर्वरित सामन्यात काय भूमिका बजावणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

जस्टीन लँगर याने चहलला बदली खेळाडू म्हणून विरोध केला असला तरीही अशा परिस्थितीत सामनाधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. जाडेजाला झालेली दुखापत पाहता त्याच्या ऐवजी बदली खेळाडू घेणं हे नियमाला धरुन असल्याचं मत समालोचनादरम्यान अनेकांनी व्यक्त केलं. रविंद्र जाडेजा हा डावखुरा अष्टपैलू आहे. फलंदाजी केल्यानंतर जाडेजाचा मधल्या फळीत गोलंदाजीसाठी वापर केला जातो. अशा परिस्थितीत तो संघात नसल्याने त्याच्या जागेवर चहलला गोलंदाजीची संधी देणं हे नियमाला धरुनच असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं.