वन-डे मालिका गमावणाऱ्या विराट कोहलीच्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात करत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. युजवेंद्र चहल, टी. नटराजन यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने सामन्यात बाजी मारली. रविंद्र जाडेजाच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या चहलने ३ बळी घेत कांगारुंच्या डावाला खिंडार पाडलं.

मात्र या सर्वांमध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणाऱ्या नटराजननेही स्वतःला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ४ षटकांत ३० धावा देत नटराजनने ३ बळी घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डार्सी शॉर्ट, मॅक्सवेल आणि स्टार्क यांना माघारी धाडलं. या कामगिरीच्या जोरावर त्याला मानाच्या यादीत स्थान मिळालं आहे.

पहिल्या वन-डे सामन्यात लाबुशेनसारख्या महत्वाच्या फलंदाजाची विकेट घेतलेल्या नटराजनने टी-२० सामन्यात मॅक्सवेलला बाद करत भारताच्या रस्त्यातली मोठी अडचण दूर केली. या मालिकेतला दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.