27 February 2021

News Flash

क्या से क्या हो गए देखते देखते; अवघ्या चार तासांत अ‍ॅडलेड कसोटीचा निकाल, भारताचा दारुण पराभव

८ गडी राखून ऑस्ट्रेलिया विजयी, मालिकेत १-० ने आघाडी

दुसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांत नाट्यमयरित्या संपुष्टात आलं आहे. ८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने १ बाद ९ अशी मजल मारली. दिवसाअखेरीस ६२ धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. ज्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीला फलंदाजी करत असताना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करु शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या डावात झटपट बाद झालेल्या मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत चांगले फटके खेळले. ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडण्याचे प्रयत्न भारताने केले, पण त्यांना यश आलं नाही. अखेरीस पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाल्यानंतर मॅथ्यू वेड धावबाद झाला आणि भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर मार्नस लाबुशेनही आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना बाद झाला. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत कांगारुंनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:23 pm

Web Title: ind vs aus 1st test australia beat india by 8 wickets poor show in 2nd innings by indians psd 91
Next Stories
1 टीम इंडियासाठी दुष्काळात तेरावा महिना
2 द्रविडला प्रशिक्षक नेमा, लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहते रवी शास्त्रींवर भडकले
3 २०२० मध्ये ‘किंग कोहली’ च्या शतकाची पाटी कोरीच
Just Now!
X