विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या ३६ धावांत संपवत ऑस्ट्रेलियाने सामन्यात दमदार पुनरागमन केलं. विजयासाठी आवश्यक असलेल्या ९० धावा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सहज पूर्ण करत तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल लावला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“हा पराभव खूप बोचणारा आहे, कदाचीत शब्दांत मांडता येणार नाही. आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती आणि त्यानंतर सगळा डाव कोलमडला. दोन दिवस तुम्ही मेहनत करुन सामन्यात आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवता पण एका तासाच्या खेळात चित्र असं काही बदलून गेलं की तिकडून सामना जिंकणं आमच्यासाठी केवळ अशक्य झालं. आम्ही विजयाच्या भावनेने खेळलोच नाही. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच मारा करत होते, पण आमचे फलंदाज फक्त धावा कशा जमवता येतील याचा विचार करत होते.”

अवश्य वाचा – २०२० मध्ये ‘किंग कोहली’ च्या शतकाची पाटी कोरीच

गोलंदाजांनी काही विशेष कामगिरी केली असं मला वाटत नाही, पण धावा जमवणं कठीण वाटत होतं. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी घेतला, अशा शब्दांमध्ये विराटने आपली नाराजी व्यक्त केली. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने विराटला सुट्टी दिली आहे.

अवश्य वाचा – द्रविडला प्रशिक्षक नेमा, लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहते रवी शास्त्रींवर भडकले

.