रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखलं. पहिल्या डावात भारतीय संघानं ५३ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघानं एक गड्याच्या मोबदल्यात ९ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (०) आणि सलामी फलंदाज मयांक अगरवाल (५) नाबाद आहेत. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ लागोपाठ दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाकडे ६२ धावांची आघाडी आहे. आजच्या एका दिवसात एकूण १५ विकेट पडल्या. यामध्ये भारताच्या पाच(पहिल्या डावात चार) आणि ऑस्ट्रेलियाच्या दहा विकेट.

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. सामन्याचे अद्याप तीन दिवस बाकी आहेत. भारतीय संघ दुसऱ्या डावात किती धावांचा पल्ला पार करतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानतर अवघ्या ११ धावांत भारताचे खेळाडू बाद झाले. विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियासमोर २४४ धावांचं आवाहन ठेवलं होतं.

भारतीय संघानं दिलेल्या आवाहनाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना बुमराहने पायचीत करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मार्नस लाबुशेनने एका बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ १९१ धावांवर आटोपला. कर्णधार टीम पेनचं अर्धशतक आणि मार्नस लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वतःवरची नामुष्की टाळली. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले.