ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघावर नामुष्कीची वेळ आली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९१ धावांत गुंडाळून ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भंबेरी उडाली. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड या दुकलीने भारतीय संघाला खिंडार पाडत संघाची अवस्था दयनीय केली. भारताचा दुसरा डाव ९ बाद ३६ वर संपुष्टात आला. मोहम्मद शमील फलंदाजी करत असताना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करु शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं आहे. या निमित्ताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आपल्या निच्चांकी धावसंख्येची नोंद केली आहे. १९७४ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने ४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ४६ वर्षांनी भारतावर ही नामुष्की ओढावली आहे.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने १ बाद ९ अशी मजल मारली. दिवसाअखेरीस ६२ धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. ज्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली.

हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. अखेरीस भारताचा दुसरा डाव ९ बाद ३६ धावांवर संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. टीम इंडियाचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. कांगारुंकडून जोश हेजलवूडने ५ तर पॅट कमिन्सने ४ बळी घेतले.