पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची दुसऱ्या डावात दाणादाण उडाली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मयांक अग्रवाल यांना एकामागोमाग एक माघारी धाडत ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफूटला ढकललं.
पहिल्या सत्रात भारताने अवघ्या १३ धावांत ५ गडी गमावले. तब्बल ५१ वर्षांनी भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांनी सर्वात कमी धावा जोडण्याची नामुष्की संघावर आली आहे. १९६९ साली हैदराबाद कसोटीत न्यूझीलंडविरोधात भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांनी फक्त २० जोडल्या होत्या.
- १९ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया – अॅडलेड कसोटी (२०२०) तिसरा डाव
- २० धावा विरुद्ध न्यूझीलंड – हैदराबाद कसोटी (१९६९) दुसरा डाव
- २१ धावा विरुद्ध न्यूझीलंड – मोहाली कसोटी (१९९९) पहिला डाव
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन माऱ्याचा नेटाने सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावात भंबेरी उडालेली पहायला मिळाली. कमिन्स आणि हेजलवूडने स्टम्पसमोर मारा करत भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. पुजारा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात शून्यावर तर विराट कोहली अवघ्या ४ धावा काढून बाद झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 10:37 am