ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर कांगारुंच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. तरीही दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय क्षेत्ररक्षकांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली.

मार्नस लाबुशेनला भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन वेळा जिवदान दिलं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या लाबुशेनचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उडाला. पृथ्वी शॉसाठी हा सोपा झेल होता…परंतू हा सोपा झेलही सोडत पृथ्वीने लाबुशेनला जिवदान दिलं. पृथ्वीने सोडलेला झेल पाहून कर्णधार विराट कोहलीही चांगलाच भडकला…मैदानातच त्याने आपली नाराजी व्यक्त केली. पाहा हा व्हिडीओ…

पृथ्वी शॉची खराब कामगिरी पाहिल्यानंतर सध्या सोशल मीडियावरुन त्याला टीकेचं धनी केलं जात आहे. पहिल्या डावात पृथ्वी पहिलंच षटक खेळत असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. दरम्यान चहापानाच्या सत्रानंतर उमेश यादवने लाबुशेनला पायचीत पकडत माघारी धाडलं, त्याने ४७ धावांची खेळी केली.