भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला अॅडलेड कसोटीत शतकाने हुलकावणी दिली आहे. सलामीवीरांनी निराशाजनक सुरुवात केल्यानंतर विराटने सर्वात आधी चेतेश्वर पुजारा आणि त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

कोहलीसोबत पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. यानंतर उप-कर्णधार अजिंक्य रहाणेसोबतही विराटने ८८ धावांची भागीदारी केली. विराट-अजिंक्यची जोडी पहिला दिवस खेळून काढेल असं वाटत असतानाच लॉयनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट धावबाद झाला. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये २०१२ साली अॅडलेडच्या मैदानावर विराट अशाच पद्धतीने धावबाद झाला होता.

१८० चेंडूत ८ चौकारांसह विराट कोहलीने ७४ धावांची खेळी केली. विराटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अनेक प्रयत्न केले, परंतू गोलंदाजांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेरीस भारतीय फलंदाजांमध्ये धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे ऑस्ट्रेलियाला यश मिळालं.