भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फिंच-वॉर्नर यांनी शतकी भागादारी करत भारतीय गोंदाजांची पिसे काढली. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत. त्यामागे खास असं कारण आहे.

आयपीएल सामन्यादरम्यान २४ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स याचं निधन झालं होतं. त्यांच्या स्मरणार्थ भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत. तसेच सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघानं एक मिनिटांचं मौनही पाळलं.

IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते डीन जोन्स यांना ओळखायचे. १९८९ मध्ये अ‍ॅशेस मालिकेच्या यशातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९८४ ते १९९२ दरम्यानच्या ५२ कसोटी सामन्यांत त्यांनी ४६.५५च्या सरासरीने ३६३१ धावा काढल्या. तर जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत.

दुसऱ्या कसोटीदरम्यानही अर्पण करणार श्रद्धांजली
मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील डीन जोन्स यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. मेलबर्न हे डीन जोन्स यांचे घरचे मैदान होते. या मैदानावर प्रेक्षकांकडून त्यांना चांगलीच दाद मिळत असे. माध्यमांतील वृत्तांनुसार, एमसीजीवरील बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान हा सन्मान दिला जाईल.