भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये शतकाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात कुलदीपने अ‍ॅलेक्स कॅरीला कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद करत आपला वन-डे क्रिकेटमधला शंभरावा बळी घेतला. यानंतर त्याच षटकात कुलदीपने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत कांगारुंना बॅकफूटवर ढकललं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या धडाकेबाज कामगिरीच्या निमीत्ताने कुलदीपने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. ५८ वन-डे सामन्यांमध्ये कुलदीपने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

याचसोबत आंतरराष्ट्रीय फिरकीपटूंच्या यादीत कुलदीपने चौथं स्थान पटकावत, माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नला माघारी धाडलं आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने नेलं. यादरम्यान विराट कोहलीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. विराट आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच झॅम्पाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ७८ धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 2nd odi kuldeep yadav took his 100th odi wicket psd
First published on: 17-01-2020 at 20:49 IST