अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत ८ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवाचा बदला या सामन्यात भारतीय संघानं घेतला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या तुल्यबळ फलंदाजांनी शरणागती पत्करली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील शतकी खेळीबद्दल कर्णधार अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या विजयानंतर त्याने पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत असून भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक ट्विट केलं.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेने एक फोटो पोस्ट केला. या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली. अजिंक्य रहाणेनं बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये संपूर्ण भारतीय संघाला स्थान दिलं. यात सपोर्ट स्टाफपासून ते अतिरिक्त खेळाडू आणि नेट गोलंदाजांचाही समावेश आहे. हाच फोटो रिट्विट करून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट केले. “भारतीय संघाला या खास विजयाच्या शुभेच्छा. आपल्या संघाचं हे खरंच दमदार पुनरागमन आहे. मी अशी प्रार्थना करेन की आपण मालिकाही जिंकावी. साऱ्यांना शुभेच्छा”, असं ट्विट त्यांनी केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही टॅग केलं.

आणखी वाचा- विजयानंतरचं रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. कर्णधार रहाणेने या डावात ११२ धावांची खेळी केली, त्यामुळे संघाला मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर आटोपला. भारताला विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ७० धावा रहाणे आणि गिल जोडीने पूर्ण केल्या आणि संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.