पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली आहे. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि नवोदीत मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात कांगारुंना धक्का देत सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं. यानंतर मॅथ्यू वेड आणि लाबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू कांगारुंवर वर्चस्व मिळवण्यासाठी कर्णधार रहाणेने गोलंदाजीत बदल करत लगेच आश्विनला संधी दिली. आश्विननेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवलं. वेड ३० धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टिव्ह स्मिथही आश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी परतला. पहिल्या सत्राअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ३ बाद ६५ पर्यंत पोहचू शकला.

दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागादीरी केली. ही जोडी मैदानावर जम बसवतेय असं वाटत असतानाच अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा बुमराहला संधी दिली, बुमराहनेही आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत ट्रॅविस हेडला रहाणेकरवी झेलबाद केलं. हेड ३८ धावा करुन माघारी परतला. यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी धाडलं. शुबमन गिलने लाबुशेनचा सुरेख झेल घेतला. लाबुशेनने ४८ धावांची खेळी केली.

चहापानापर्यंत ५ बाद १३६ अशी अवस्था असलेल्या ऑस्ट्रेलियाची अखेरच्या सत्रात पडझड झाली. तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला द्विशतकी टप्पा ओलांडून देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारताकडून बुमराहने ४, आश्विनने ३, सिराजने २ तर जाडेजाने १ बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने ४८ तर ट्रॅविस हेडने ३८ धावा करत एकाकी झुंज दिली.