News Flash

Ind vs Aus : मेलबर्न कसोटीवर भारताचं वर्चस्व, ऑस्ट्रेलिया नाममात्र आघाडी घेण्यात यशस्वी

तिसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३

मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली. परंतू कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसऱ्या दिवसातलं अखेरचं सत्र खेळून काढत कांगारुंना २ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ६ गडी बाद १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स उमेश यादवच्या गोलंदाजीवर ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनने त्याला कर्णधार रहाणेकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. लाबुशेनने २८ धावा केल्या. यानंतर वेड आणि स्मिथ यांनी उरलेली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.

अवश्य वाचा –  तुमचा तो बाब्या, आमचं ते…; पेन आणि रहाणेसाठी वेगळा नियम, तिसऱ्या पंचांविरोधात चाहत्यांमध्ये नाराजी

तिसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहने स्मिथला माघारी धाडत भारताला महत्वाचा बळी मिळवून दिला. पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यातही स्मिथ अपयशी ठरला, अवघ्या ८ धावा काढून तो बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने मॅथ्यू वेड, ट्रॅविस हेड आणि कर्णधार टीम पेन यांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर ग्रीन आणि कमिन्स यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघावर डावाने पराभवाची नामुष्की टाळली. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडून रविंद्र जाडेजाने २ तर बुमराह-यादव-सिराज आणि आश्विन या चौकडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:39 pm

Web Title: ind vs aus 2nd test day 3 melbourne 3rd session updates psd 91
Next Stories
1 तुमचा तो बाब्या, आमचं ते…; पेन आणि रहाणेसाठी वेगळा नियम, तिसऱ्या पंचांविरोधात चाहत्यांमध्ये नाराजी
2 रहाणेचा मास्टरस्ट्रोक; राहुलऐवजी जाडेजाला खेळवण्याचा डावपेच यशस्वी
3 अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर
Just Now!
X