मेलबर्न कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला चांगली लढत दिली आहे. पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी चहापानाच्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ६५ अशी केली आहे. सध्या भारतीय संघाकडे ६६ धावांची आघाडी असून ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ किल्ला लढवत आहेत.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५ बाद २७७ पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं.

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स उमेश यादवच्या गोलंदाजीवर ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनने त्याला कर्णधार रहाणेकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. लाबुशेनने २८ धावा केल्या. यानंतर वेड आणि स्मिथ यांनी उरलेली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.