मेलबर्नवर आजपासून ‘बॉक्सिंग डे’ लढतीला प्रारंभ; गिल, सिराज यांना पदार्पणाची संधी

मेलबर्न : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ मानला जाणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेसाठी शनिवारपासून सुरू होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना दुहेरी कौशल्याची ‘कसोटी’ पाहणारा ठरणार आहे. पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवातून सावरत असलेल्या भारतीय संघाला दिशा दाखवण्याबरोबरच फलंदाजीतही छाप पाडण्यासाठी रहाणे उत्सुक आहे.

अ‍ॅडलेड येथे झालेल्या प्रकाशझोतातील कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला आठ गडी राखून सहज धूळ चारली. या कसोटीच्या दुसऱ्या डावात नामांकित फलंदाजांनी सजलेला भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नीचांकी धावसंख्या नोंदवल्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील संघावर चोहीकडून टीकेचा वर्षांव करण्यात आला. त्यातच कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतल्याने संघाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान रहाणेपुढे उभे ठाकले आहे.

भारताने शुक्रवारी दुपारीच अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला. पृथ्वी शॉवर पुन्हा भरवसा दर्शवण्याऐवजी संघ व्यवस्थापनाने युवा शुभमन गिलला संधी दिली आहे. त्याशिवाय जायबंदी मोहम्मद शमीच्या जागी स्थान लाभलेला मोहम्मद सिराज कसोटी पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. वृद्धिमान साहाच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षकाची भूमिका बजावेल, तर रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यामुळे त्याचेही कोहलीच्या जागी संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीतील विजयी संघच दुसऱ्या लढतीसाठीही कायम राखण्याची शक्यता आहे.

मयांकच्या साथीने गिल सलामीला

धावांसाठी झगडणाऱ्या पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आल्यामुळे पृथ्वीच्याच वयाचा गिल हा आता मयांक अगरवालच्या साथीने सलामीला उतरणार आहे. हनुमा विहारीचे संघातील स्थान कायम राखण्यात आल्याने के. एल. राहुलला मात्र तिसऱ्या कसोटीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विहारी आणि जडेजा यांच्यावर अष्टपैलूत्वाची मदार असेल.

स्मिथ, हेझलवूडपासून सावध

कारकीर्दीतील सात ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत स्मिथने आतापर्यंत चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे स्मिथपासून भारताला सावध राहावे लागेल. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचे वेगवान त्रिकूट पुन्हा भारतीय फलंदाजांवर आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. विशेषत: अ‍ॅडलेड कसोटीत भारताच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या जोश हेझलवूडची गोलंदाजी नेटाने खेळणे गरजेचे आहे. डेव्हिड वॉर्नर या कसोटीतही खेळणार नसल्याने जो बर्न्‍स-मॅथ्यू वेडच सलामीला येतील.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत. २०१७मध्ये धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया, तर २०१८मध्ये बेंगळूरु येथे अफगाणिस्तानविरुद्ध भारताने रहाणेच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे.

यंदाच्या वर्षांतील आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी भारताने प्रथम फलंदाजी करताना गमावल्या आहेत. यामध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा समावेश आहे.

१०० भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा १०० वा कसोटी सामना असून आतापर्यंत ४३ सामने ऑस्ट्रेलियाने आणि २८ सामने भारताने जिंकले आहेत. याशिवाय २७ सामने अनिर्णीत झाले आहेत, तर एक सामना ‘टाय’ झाला आहे.

संघ

भारत (अंतिम ११) : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), जो बर्न्‍स, मॅथ्यू वेड, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड, मार्कस हॅरिस, मोझेस हेन्रिक्स, मायकेल नेसा, जेम्स पॅटिन्सन, मिचेल स्वेपसन.

सामन्याची वेळ : पहाटे ५ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन ३ आणि संबंधित एचडी वाहिन्या.