ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार अवस्थेत असून भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा बळी गमावला. सध्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर आहेत. सामन्याच्या उवर्रित एका दिवसाच्या खेळात विजयासाठी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ बळींचाी आवश्यकता आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात विजयसाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली. ७१ धावांच्या भागीदारी नंतर गिल ३१ धावांवर बाद झाला. रोहितने दमदार खेळ करत वर्षातील पहिलं अर्धशतक झळकावलं पण दुर्दैवाने एका उसळत्या चेंडू मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ५२ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा (९) आणि अजिंक्य रहाणे (४) या दोघांनी खेळपट्टीवर तग धरला. हेजलवूड आणि कमिन्सने १-१ बळी टिपला.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात झाली. मार्नस लाबूशेनने आपलं सामन्यातलं दुसरं अर्धशतक झळकावलं. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथनेही आपलं सामन्यातलं दुसरं अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे धावगती वाढवताना बाद झाले. लाबूशेनने ७३ तर स्मिथने ८१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीन सुरुवातीला संयमी आणि नंतर आक्रमक खेळी करत ८४ धावा ठोकल्या. चहापानाच्या सुटीत यजमानांनी ६ बाद ३१२ धावांवर डाव घोषित केला. सैनी आणि अश्विनने २-२ तर सिराज, बुमराहने प्रत्येकी १ बळी टिपला.