भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. भारतीय संघ विदेशात पहिल्यांदाच दिवस-रात्र सामना खेळत आहे. भारतीय संघानं १९८४ मध्ये एडिलेड मैदानावर पहिला सामना खेळला होता. तर अखेरचा सामना २०१८ मध्ये झला आहे. पाहूयात एडिलेड मैदानावर भारतीय संघाचं रेकॉर्ड कसं आहे.

१९८४ ते २०१८ या कालावधील भारतानं एडिलेडमध्ये १२ सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त दोन वेळा भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर सातवेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामने अनिर्णित राहिलेत. लाला अमरनाथ, बिशन सिंह बेदी, चंदू बोर्डे, सुनील गावसकर, कपिल देव, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबले, वीरेंद्र सहवाग आणि विराट कोहली यांनी या मैदानावर भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. विराट कोहलीनं येथे दोनवेळा भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. उद्या तिसऱ्यांदा या मैदानावर विराट कोहली कर्णधार म्हणून उतरणार आहे.

एडिलेडमधील भारतीय संघाची कामगिरी निरशजनक आहे. २०१४ मध्ये विराट कोहलीनं येथे दोन्ही डावांत शतक साजरं केलं होतं. मात्र, तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. विराट कोहलीनं येथे खेळलेल्या तीन सामन्यात तीन शतकं झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात विराट कोहलीकडून अशाच खेळीची आपेक्षा आहे.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला येथे पहिल्यांदा विजय मिळाला होता. २००४ मध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा चार गड्यांनी पराभव केला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं ५५६ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून द्रविड २३३ आणि लक्ष्मण १४८ यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतीय संघानं ५२३ पर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ १९६ धावांवर ढेपाळला. भारतीय संघानं २३० धावांचं आवाहन सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केलं होतं.

पहिल्या विजयानंतर तब्बल १४ वर्षानंतर २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं पुन्हा एकदा एडिलेडमध्ये विजयी पथका फडकावली. भारतीय संघानं पहिल्या डावात २५० धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाला २३५ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. दुसऱ्या डावात भारतीय संघानं ३०७ धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३२३ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ २९१ धावांपर्यंत मजल मारु शकला.