तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखत १९७ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्यानंतर भारतीय संघानेही चांगली झुंज देत २४४ धावा केल्या. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेन सामन्यातील दुसऱ्या अर्धशतकाच्या नजीक पोहोचला आहे. आजच्या दिवसाच्या खेळात एक वादाचा प्रसंग मैदानावर घडला.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात नॅथन लायन गोलंदाजी करत असताना पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पुजाराला पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने DRSची मदत घेतली. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागला की नाही याबद्दल नीट कळू शकलं नाही. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागल्याची शक्यता असल्याने ऑफ साईडच्या कॅमेरात काहीही कळलं नाही. लेग साईडच्या कॅमेरामधून पाहता सिली पॉईंटच्या फिल्डरमुळे काहीही दिसत नव्हते. स्निको मीटरची मदत घेत चेंडू बॅटला लागला आहे का ते पाहण्यात आले, तेव्हा मीटरवर हलकी हालचाल दिसली. पण हॉटस्पॉटमध्ये पुजाराच्या बॅटवर चेंडू लागल्याचा काहीच पुरावा दिसला नाही, त्यामुळे त्याला नाबाद ठरवण्यात आले.

घडलेला प्रकार पाहून ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन प्रचंड भडकला. मैदानावरील पंच विल्सन यांच्याशी पेन वाद घालू लागला. त्यावेळी पंचांनी त्याला सांगितलं की तिसऱ्या पंचांचा निर्णयच अंतिम असेल. त्यावर उत्तर देताना पेनने पंचांना शिवीगाळ केली. “F**king consistency, Blocker, there’s a thing (spike) that goes past it”, असं वाक्य उच्चारत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने २४४ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल (५०) आणि चेतेश्वर पुजारा (५०) दोघांनी अर्धशतकं ठोकली. अजिंक्य रहाणे (२२), ऋषभ पंत (३६) आणि रविंद्र जाडेजा (२८*) यांनीही डावाला हातभार लावला. त्यानंतर दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दमदार खेळी केली.विल पुकोव्हस्की आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी स्वस्तात तंबूचा रस्ता धरला. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन जोडीने पुन्हा एकदा दमदार भागीदारी केली. त्याने संघाला दिवसाचा खेळ संपेपर्यंत १९७ धावांची आघाडी मिळवून दिली.