ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला दुसऱ्या टी २० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलने झंझावती शतक (११३*) ठोकत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांची टी २० मालिका २-० अशी जिंकली. पण हा खास मालिका विजय ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेल नव्हे तर फिरकीपटू झाम्पामुळे मिळाला असल्याचे कर्णधार फिंचने म्हटले आहे.

सामना संपल्यानंतर बोलताना फिंच म्हणाला की भारताविरुद्ध भारतात कोणत्याही प्रकारची मालिका जिंकणे हे कायम खास असते. या सामन्यात आणि मालिकेत ग्लेन मॅक्सवेल अत्यंत उत्तम खेळला. पण माझ्या मते फिरकीपटू ऍडम झाम्पा या खेळाडूमुळे ही मालिका खास ठरली. मोठ्या धावसंख्येच्या खेळात ४ षटकात केवळ २३ धावा खर्च करणे ही खूप कौतुकास्पद बाब आहे. त्याच्या या कामगिरीमुळे मालिका खास ठरली.

गेल्या १०-११ महिन्यांपासून आम्ही ऑस्ट्रेलियाचा संघ बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. विश्वचषकासाठी आम्ही सज्ज होत आहोत. या प्रवासादरम्यान आम्हाला अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण हे सर्व धक्के आमच्या संघाने सहन केले आणि अखेर आम्ही प्रगती केली. आता विश्वचषक स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना आमचा संघ असाच प्रतिपथावर राहील अशी अपेक्षा आहे, असे फिंच म्हणाला.

दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हुकले. तो २६ चेंडूत ४७ धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या २३ चेंडूत ४० धावा आणि विराटच्या ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने एकहाती किल्ला लढवला. त्याला जोरदार फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टची काही काळ साथ मिळाली. शॉर्ट ४० धावांवर झेलबाद झाला. पण मॅक्सवेलने डाव सांभाळला आणि फटकेबाजी करत शतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकत ५५ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.