भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ गड्यांची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या लॉयनला सामनावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्यानुसार ऑस्ट्रेलियाचा मालिका जिंकणार असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केले आहे.

मी ऑस्ट्रेलियात होतो. आता मी (ख्रिसमस आणि नववर्षासाठी) येथून जात आहे. पण जात जाता मला असे वाटते की ऑस्ट्रेलियाच ही कसोटी मालिका जिंकेल आणि नॅथन लॉयन हा या मालिकेतील परिणामकारक खेळाडू ठरेल, असे वॉन याने ट्विट केले आहे. तसेच मी जानेवारी महिन्यात परतणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने यजमानांवर ३१ धावांनी विजय मिळवला होता. ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नव्हते. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला होता. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली आणि भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या असल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.