चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दोन्ही दिवसांवर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या. त्याआधी भारताचा पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित करण्यात आला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने धावांचा डोंगर उभारून विजयासाठी भक्कम पायाभरणी केली. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात मात्र राडा पाहायला मिळाला.

चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यामध्ये मैदानातच भांडण झाले. या भांडणाचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर झाल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात भांडण झाले होते. या गोष्टीला गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनीही दुजोरा दिला आहे.

 

‘चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये बेबनाव झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची वेगळी रणनीती होती, पण कर्णधार पेनने मात्र या रणनीतीची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पेन आणि स्टार्क यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यातून काही गैरसमज झाले. या साऱ्या गोष्टीमुळे आम्ही निराश आहोत. सामन्याच्या पहिल्या दिवशी आमच्याकडून चांगला खेळ झाला नाही, ही आम्हाला खंत आहे.’, असे सेकर म्हणाले.