भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला केवळ २३५ धाव करता आल्या. भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. ट्रेव्हिस हेडच्या ७२ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला किमान २०० धावांचा टप्पा तरी गाठता आला, अन्यथा इतर फलंदाज पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे भारताने पाहल्या डावात १५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.या डावात सलामीवीर फिंच बाद झाल्यावर विराटने जे सेलिब्रेशन केले, ते ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना रुचले नाही. असेच सेलिब्रेशन आम्ही केले असते तर जगाला मिरच्या झोंबल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जसेजसे बाद होत होते, तसे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य अधिकच वाढत होते. याच दरम्यान महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तुफान सेलिब्रशन करत होता.

या बाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले की अशा पद्धतीचे सेलिब्रेशन जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केले असते, तर संपूर्ण क्रिकेट जगताने त्यावर लगेच टीका केली असती. आनंद साजरा करत सेलिब्रेशन करणे आणि समोरच्या खेळाडूला हिणवणे यात अतिशय थोडे अंतर असते. विराटमध्ये क्रिकेटचे वेड आहे. पण त्याबरोबरच मैदानावरील सभ्यताही तितकीच महत्वाची असते, असे ते म्हणाले.