IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाकडून एक वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्याआधी मैदानावर अनवाणी पायाने उतरणार असल्याचा निर्णय कर्णधार टीम पेन याने जाहीर केला आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वन-डे आणि टी २० मालिकेने होणार आहे. तर सांगता कसोटी मालिकेने होणार आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम वन डे सामने खेळणार आहे. वन डे सामन्यांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ मैदानावर अनवाणी अर्थात पायात बूट न घालताच उतरणार आहे. मैदानात हे सर्व खेळाडू गोलाकार उभे राहतील आणि त्यानंतर काही वेळाने आत जाऊन बूट घालून सामन्याला सुरुवात करतील.

काय आहे नक्की अनवाणी येण्यामागचं कारण?

भारताविरुद्धच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेनने जाहीर केलं. त्याविषयी सांगताना पेन म्हणाला, “जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल”, असे टीम पेनने सांगितलं.