पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव सर्वबाद ३०७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली. आता भारताला विजयासाठी ६ बळींची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे.

या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा संघ काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज कॉलिन गेस्ट यांचे निधन. ८१ वर्षीय गेस्ट यांचा शनिवारी, ८ डिसेंबरला मृत्यू झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून केवळ १ कसोटी सामना खेळला. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ३६ सामन्यात ११५ बळी टिपले. त्यांना श्रद्धांजली म्हणून सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ काळया पट्ट्या बांधून मैदानात उतरला.

दरम्यान, आता भारताला विजयासाठी ६ बळींची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचा केवळ एका दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामन्यात रंगत आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात होण्याआधी भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि भारताला समाधानकारक आघाडी मिळवून दिली.

३ बाद १५१ या धावसंख्येवरुन आज भारताच्या डावाला सुरुवात झाली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीने भारताच्या खात्यात धावसंख्येची भर घालत डावाला आकार दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. अखेर नॅथन लॉयनने पुजारा (७१) आणि त्यापाठोपाठ रोहित शर्माचा (१) अडसर दूर करत भारताला दोन धक्के दिले. पण पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. उपहारानंतर मात्र भारताचा डाव गडगडला. ऋषभ पंत (२८), अश्विन (५), रहाणे (७०), शमी (०) आणि इशांत शर्मा हे पाच गडी भारताने झटपट गमावले. दुसऱ्या डावात लॉयनच्या ६ गड्यांव्यतिरिक्त स्टार्कने ३ तर हेजलवूडने १ गडी माघारी धाडला.