16 October 2019

News Flash

चौकशी संपेपर्यंत पांड्या, राहुलचे भवितव्य अधांतरी

'त्यांच्यावर केवळ २ सामन्यांची बंदी नव्हे तर चौकशी संपवून कारवाई होईपर्यंत बंदी घालण्यात यायला हवी'

‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर टीका होत आहे. या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्याचा प्रस्तावदेखील ठेवण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर केवळ २ सामन्यांची बंदी नव्हे तर चौकशी संपवून कारवाई होईपर्यंत बंदी घालण्यात यायला हवी, असे मत BCCI च्या प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्य डायना एडलजी यांनी व्यक्त केले आहे.

‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ‘हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण मला पटलेले नाही. त्यामुळे मी या गोष्टीसाठी त्या दोन्ही खेळाडूंना दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला आहे. पण याबाबत अंतिम निर्णय हा डायना एडलजी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल’, असे विनोद राय यांनी सांगितले होते.

त्यावर डायना एडलजी यांनी आपले मत व्यक्त केले. ‘या दोघांनी जे वक्त्यव्य केले आहे, त्यासाठी त्यांची चौकशी व्हायला हवी. तसेच त्यांची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोवर त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे. BCCI चे CEO राहुल जोहरी यांच्यावर ज्यावेळी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते, तेव्हा त्यांच्यावरील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्याच प्रकारची कारवाई या दोघांच्या बाबतीतही व्हायला हवी’, असे मत डायना एडलजी यांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे म्हटले होते.

First Published on January 11, 2019 4:57 pm

Web Title: ind vs aus bcci coa member diana edulji says it will be imperative that hardik pandya and kl rahul be put under suspension till a further course of action is decided for this misconduct