भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी २० सामना बंगळुरू येथे होणार आहे. २ सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना विशाखापट्टणम येथे झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाला दिलेले १२७ धावांचे आव्हान त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकणे हे आवश्यक आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. BCCI ने याबाबत खास फोटो आणि ट्विट केले आहे. पॅनोरॅमा पद्धतीचा हा फोटो टाकला असून त्यात BCCI ने खेळाडू कशा पद्धतीने सराव करत आहेत आणि नेट्स कशा पद्धतीने लावल्या आहेत, हे एका फोटोतून दाखवून दिले आहे.

याशिवाय, BCCI मूळचा बंगळुरूचा असलेला लोकेश राहुल याने नेट्समध्ये केलेल्या सरावाचा आणि फटकेबाजीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. पहिल्या सामन्यात राहुलने ५० धावा केल्या होत्या. त्या सामन्यात राहुलने ३६ चेंडू खेळले होते.

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२६ धावा केल्या. राहुलने दमदार पुनरागमन केले. त्याने ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले. यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावांची खेळी केली. तर कोहलीने १७ चेंडूत २४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक लगावत ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर चौकार लगावून तो ५६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी २ चौकार आणि २ वेळा चोरट्या दुहेरी धावा मिळवत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.