यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभूत केले आणि ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ असे पुनरागमन केले. २८७ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव १४० धावांत आटोपला. पहिल्या डावात शतक ठोकणारा विराट कोहली दुसऱ्या डावात अपयशी ठरला. त्यामुळे ‘जेव्हा आपला संघ सामना हरतो, तेव्हा शतकाला काहीच अर्थ उरत नाही’, अशी भावना विराटने सामना सम्पल्यानंतर व्यक्त केली.

जेव्हा आपला संघ पराभूत होतो, तेव्हा आपल्या १०० धावांच्या खेळीला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे मला माझ्या शतकाबाबत काहीच भाष्य करायचे नाही. आता मी पुढील सामन्यातील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. मला बाद देणायचा निर्णय पंचांनी घेतला आणि त्याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही, असे कोहलीने सांगितले.

संघ म्हणून आम्ही सामन्यातील काही टप्प्यांमध्ये उत्तम खेळ केला. पण आम्हाला ती कामगिरी जास्त काळ टिकवता आली नाही. ऑस्ट्रेलियाने नक्कीच आमच्यापेक्षा चांगला खेळ केला, त्यामुळेच ते जिंकले. या खेळपट्टीवर ३३० धावा खूपच होत्या. आम्हाला संपूर्ण सामन्यात चांगला खेळ करणे शक्य झाले नाही आणि ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला, असे म्हणाला.

आमच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. काही वेळा त्यांना गडी बाद करता आले नाहीत, पण त्यांनी टाकलेली गोलंदाजी उच्च दर्जाची होती. या खेळपट्टीवर रवींद्र जडेजाला खेळवावे असे आमहाला वाटले नाही. पण लॉयनने फिरकीपटू म्हणून उत्तम कामगिरी केली.