भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या सामन्यात भारताने चौथ्या कसोटीवर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या आहेत. पण त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे.

या मालिकेत पुजाराने पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या अशा तीन कसोटीत तीन शतके ठोकली. यासह तो ऑस्ट्रेलियात एकाच मालिकेत ३ शतके ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. या सामन्यात पुजारा द्विशतक ठोकणार असे वाटत असतानाच त्याला द्विशतकाने हुलकावणी दिली. त्याने ३७३ चेंडूत १९३ धावा केल्या. द्विशतकाकडे वाटचाल करताना तो लॉयनच्या चेंडूवर झेलबाद झाला. लॉयनेच त्याचा झेल टिपला. त्यामुळे द्विशतक करणे शक्य झाले नाही. पण ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम त्याने स्वतःच्या नावे केला. त्याने द्रविडने २००३-०४मध्ये केलेला विक्रम मोडला.

याशिवाय, पुजाराने एकाच मालिकेत चार कसोटींमध्ये मिळून एकूण १ हजार ७०२ मिनिटे फलंदाजी केली. म्हणजेच सुमारे २८ तास आणि २२ मिनिटे पुजारा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ बनून उभा राहिला. कसोटी सामन्यात एका दिवसाचा खेळ हा अंदाजे ६ तासांचा (उपहार आणि चहापान वगळून) असतो. त्यानुसार पुजाराने सुमारे ५ दिवस म्हणजेच संपूर्ण एक कोष्टी सामना फलंदाजी केली.

 

तसेच ५०० मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळपट्टीवर फलंदाजी करण्यातही पुजाराने दिग्गज फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवले.

 

दरम्यान, या सामन्यात पुजाराव्यतिरिक्त ऋषभ पंतनेही दीडशतक लगावले. पंतने नाबाद १५९ धावा लगावल्या. १८९ चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने १५ चौकार आणि १ षटकार खेचला. या खेळीसह पाहुण्या संघाच्या यष्टीरक्षकाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा दोनही देशात शतक झळकावणारा ऋषभ दुसरा फलंदाज ठरला.