ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने सामन्यावर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या आहेत. पण त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात चेतेश्वर पुजाराला द्विशतकाने हुलकावणी दिली. त्याने ३७३ चेंडूत १९३ धावा केल्या. द्विशतकाकडे वाटचाल करताना तो लॉयनच्या चेंडूवर झेलबाद झाला. लॉयनेच त्याचा झेल टिपला. पण द्विशतक करणे शक्य झाले नसले, तरीही ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा नवा विक्रम पुजाराने केला. पुजाराने सिडनीच्या मैदानावर केलेल्या कामगिरीनंतर त्याने मालिकेत एकूण १२१७ चेंडू खेळले. या आधी द्रविडने २००३-०४मध्ये १२०३ चेंडू खेळले होते. पुजाराने हा विक्रम मोडला.

 

या यादीत माजी क्रिकेटपटू विजय हजारे तिसऱ्या (११९२ चेंडू), कर्णधार विराट कोहली चौथ्या (१०९३ चेंडू) आणि माजी कर्णधार सुनील गावसकर पाचव्या (१०३२) स्थानी आहेत.

दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या सामान्यतही भारताने पहिल्याच डावात ६२२ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयी होण्यासाठी ६२२ धावांपेक्षा जास्त धावा करून भारताला पुन्हा एकदा बाद करावे लागेल. सामन्यातील केवळ ३ दिवसांचा खेळ शिल्लक असताना ही बाब घडणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकू शकतो किंवा अनिर्णित राहू शकतो. अशा परिस्थितीत भारत ऑस्ट्रेलियात ७१ वर्षांमधील आपला पहिलावहिला कसोटी मालिका विजय नोंदवू शकतो.