चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने ६२२ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून अपेक्षित झुंज पाहायला मिळाली नाही. सलामीवीर मार्कस हॅरिस वगळता इतर एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. विजिगीषू वृत्तीच्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अशी असमाधानकारक खेळी केल्यामुळे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग चांगलाच भडकला.
तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद २३६ होती. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी काही काळ झुंज दिली. पण नॅथन लॉयनला ज्या चेंडूवर बाद देण्यात आले, तो निर्णय साशंक होता. अशा वेळी ऑस्ट्रेलियाकडे २ DRS रिव्ह्यू शिल्लक असतानाही लॉयनने तो का वापरला नाही. तो सरळ मैदानाबाहेर निघून गेला. यावरून ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्याची किंवा वाचवण्याची अजिबात इच्छा नसल्याचं स्पष्ट दिसून येतं, अशा शब्दात पॉन्टिंगने आपला राग व्यक्त केला.
पॉन्टिंग या वेळी मिचेल स्टार्कवर देखील भडकला. लॉयनला बाद देण्यात आले तेव्हा मिचेल स्टार्क नॉन-स्ट्राईकवर उभा होता. लॉयनने रिव्ह्यू घेण्याबद्दल स्टार्कला विचारलंदेखील होतं. पण स्टार्कने सरळ हात झटकले आणि निर्णय लॉयनवर ढकलला. ही बाब मला जास्त खटकली, असे पॉन्टिंग म्हणाला. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे २ गडी शिल्लक होते. त्यामुळे रिव्ह्यू घेतला असता आणि तो चुकीचा ठरला असता तरीही ऑस्ट्रेलियाचे फारसे नुकसान झाले नसते. अशा वेळी आशाच सोडून देणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे पॉन्टिंग म्हणाला.
दरम्यान, हा सामना सध्या रंगतदार अवस्थेत असून भारताला विजयासाठी एका दिवसाच्या खेळात १० गडी बाद करावे लागणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 6, 2019 2:56 pm