भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ३ टी२० सामने, ४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिका रंगणार आहेत. या दौऱ्यासाठी २-३ दिवसांपूर्वीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. सामन्याआधी काही दिवस भारताच्या संघाला तेथील खेळपट्ट्या आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे, म्हणून खेळाडूंनी मैदानावर सराव केला. या दरम्यानचे काही क्षण खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. खेळाडूंव्यतिरिक्त BCCIने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज खेळाडू विराटला टिप्स देत आहे की काय, अशी चर्चा रंगल्याचे दिसून आले.

गॅब्बा येथील मैदानावरील आज भारतीय संघाने सराव केला. यावेळी आघाडीचे फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांनी कसून सराव केला. चेंडूचा बाउन्स आणि वेग याचा अंदाज यावा यासाठी या सरावाचा भारतीय फलंदाजांना नक्कीच फायदा होणार आहे. पण याशिवाय, BCCIने ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज आणि निर्भीड खेळाडू भारतीय संघाच्या सरावाच्या ठिकाणी उपस्थित असलेला दिसला. हा खेळाडू म्हणजे माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट.

विराट कोहली आणि अॅडम गिलख्रिस्ट

 

गिलख्रिस्ट सरावाच्या वेळी भारतीय संघाबरोबर मैदानावर होता. इतकेच नव्हे तर या खेळाडूने कर्णधार विराट कोहली याच्याशी गप्पदेखील मारल्या. या दोघांमध्ये झालेल्या गप्पा गोष्टी या रंगतदार झाल्या, हे त्यांच्या फोटोतील चेहऱ्यावरील हास्यामुळे कळून येत आहेच.

पण याशिवाय, कोहलीला त्याच्याकडून या खेळपट्ट्यांवर कशा पद्धतीने फलंदाजी करावी, याबाबत टिप्सदेखील नक्कीच मिळाल्या असतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या संवादाचा कोहली आणि विराटसेनेला किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.