दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १४६ धावांनी विजय मिळवला आणि ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. शेवटच्या दिवसातील तासाभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना खिशात घातला. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या फिरकीपटू लॉयनला सामनावीर घोषित करण्यात आले.या सामन्यात एकही फिरकीपटू न घेता भारत ४ वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. या संघ निवड प्रक्रियेवर सेहवागने टीका केली.

सेहवागने भारताचा पराभव झाल्यावर ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘या पराभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारत केवळ ४ गोलंदाज घेऊनच खेळला नाही. तर भारत ११ क्रमांकाचे ४ फलंदाज घेऊन खेळला. ज्या फलंदाजांना ८, ९, १० आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. असे असूनही ऑस्ट्रेलियाने शतकी सलामी दिली आणि भारताच्या दोन्ही डावांची सुरुवात खराब झाली. भारत पुढच्या सामन्याआधी पराभवातून काही तरी शिकेल अशी अपेक्षा, असे ट्विट त्याने केले आहे.

दरम्यान, भारताला पहिल्या डावात ४३ धावांनी पिछाडीवर रहावे लागले होते. तर दुसऱ्या डावात भारताचा पूर्ण डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. त्यामुळे सर्व स्तरातून भारतीय संघ निवडीवर टीका करण्यात येत आहे आणि ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

==