भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील आठवड्यात कसोटी मालिका सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत, मात्र त्यापैकी सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडणे ही कसोटी असणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला संधी देण्यात आली तर मला आश्चर्यच वाटेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

भुवनेश्वर कुमार (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही कालावधीपासून भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याच्या गोलंदाजीवर तर संघ व्यवस्थापनाने कायम विश्वास दाखवला आहेच. पण त्यासह तो तळाला येऊन धावसंख्येत उपयुक्त भर घालत असल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. तरीदेखील भुवनेश्वरला संघात स्थान देणे मांजरेकर यांना न पटणारे आहे.

माझ्या मते, इशांत शर्माची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी सातत्यपूर्ण होती. त्यामुळे तो तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळू शकेल. जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाजीचा आधार आहे. त्यामुळे तो नक्कीच संघात असेल. याशिवाय मोहम्मद शमीची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी उल्लेखनीय होती. त्यामुळे त्यालाही संघात स्थान दिले तर हरकत नाही. पण भुवनेश्वर कुमारची दुखापतीआधीची गोलंदाजी आणि नंतरची गोलंदाजी यात फरक आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत मी तर माझ्या संघात त्याला घेणार नाही, असे ते म्हणाले.