भारतीय संघाने संयमी फलंदाजी आणि अचूक वेगवान गोलंदाजी यांच्यावर जोरावर पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३१ धावांनी पराभूत केले. या सामन्यात वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज निष्प्रभ ठरले. जसप्रीत बुमराह याने मोक्याच्या क्षणी बळी टिपले आणि भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे आणि पद्धतीचे कौतुक ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने केले आहे.

जसप्रीत बुमराह

बुमराह एक उत्तम आणि चतुर गोलंदाज आहे. तो ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो, ते कौतुकास्पद आहे. बुमराह गोलंदाजी करताना सामन्याच्या गरजेनुसार आपल्या चेंडूचा टप्पा आणि वेग नियंत्रित करतो. ही गोष्ट आपल्या इच्छेनुसार करणे ही कला आहे आणि ती कला बुमराहला अवगत आहे. म्हणूनच बुमराह हा आधुनिक क्रिकेटमधील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, अशा शब्दात त्याने बुमराहची स्तुती केली आहे.

बुमराहचा गोलंदाजीतीचा रन-अप आणि फॉलो थ्रू हे दोन्हीही उत्तम आहेत. तो यॉर्कर आणि बाउन्सर चेंडू अत्यंत शिताफीने टाकतो. गोलंदाजीची धावत येताना तो जी पद्धत वापरतो त्या पद्धतीमुळे त्याच्या दुखापतीच्या शक्यता देखील कमी होतात. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे आणि त्यामुळेच तो भारतीय संघासाठी महत्वाचा आहे, असेही मॅकग्राने सांगितले.