पहिल्या वन-डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 237 धावांचं आव्हान भारताने केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. या दोन्ही फलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची डाळ शिजलीच नाही. केदार जाधवने नाबाद 81 तर धोनीने नाबाद 59 धावांची खेळी केली. मात्र या विजयात भारतासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, महेंद्रसिंह धोनी आपल्या जुन्या फॉर्मात परतला आहे.

भारताचे 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने महत्वाच्या षटकांमध्ये भारतीय डावाला आकार दिला. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. एकदा खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजीला सुरुवात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा धोनीने लागोपाठ दोन चौकार लगावत पूर्ण केल्या. वन-डे क्रिकेटमध्ये विजयी धाव काढण्याची धोनीची ही तिसावी वेळ ठरली आहे.

30 मे रोजी सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाचा ही अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारत कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.