‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५ नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलचे कार्याकारी अध्यक्ष सुंदर पिच्चई यांनीही भारतीय संघाच्या या विजयानंतर भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. ट्विटरवरुन सुंदर पिचाई यांनी आपल्यातील क्रिकेट चाहत्याला भावलेल्या या सामान्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात.

सामाना संपल्यानंतर सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरुन भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्यात. हा भारताचा आतापर्यंतच्या सर्वोत्तम मालिका विजयांपैकी एक विजय आहे. भारतीय संघांचे अभिनंदन आणि ऑस्ट्रेलियन संघही छान खेळला. खूप छान मालिका झाली, असं ट्विट सुंदर यांनी केलं आहे. सुंदर यांचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून अर्ध्या तासाच्या आत जवळजवळ पंधरा हजार जणांनी ते रिट्विट केलं आहे.

पिचाई यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. याबद्दल ते अनेकदा उघडपणे बोलले आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीमधील एका मैदानात क्रिकेटही खेळले होते. अनेकदा पिचाई क्रिकेटमधील महत्वाच्या घडामोडींवर कार्यक्रमांमध्ये किंवा सोशल नेटवर्कींगवरुन बोलताना दिसतात. आजच्या विजयानंतर त्यांच्यातील क्रिकेट चाहत्याला आणि भारतीयालाही नक्कीच आनंद झाल्याचे त्यांच्या ट्विटमधून दिसून येत आहे.

नक्की पाहा >> असे आहेत पिचाई: चहा अन् क्रिकेटचे प्रेम, २० हून अधिक स्मार्टफोन अन् बरचं काही…

पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.