चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपवला. कुलदीप यादवने ५ बळी टिपून भारताला पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे यजमान संघावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. भारताचा संघ या सामन्यात वरचढ असल्याने मैदानावरदेखील भारतीय खेळाडू आनंदी होते. तशातच राखीव खेळाडू म्हणून मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने मैदानावर ताल धरला.

भारताच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ‘भारत आर्मी’चे सदस्य सामना पाहायला उपस्थित असतात. भारत आर्मी कायम भारतीय खेळाडूंचे मैदानाबाहेरून गाणी गाऊन किंवा विशेष गाणी बनवून मनोरंजन करत असते. तसेच एक गाणे आज भारत आर्मी गात होती. त्यावेळी सीमारेषेवर फिल्डिंग करणाऱ्या हार्दिक पांड्याने तेथेच त्या गाण्यावर ताल धरला. हा व्हिडीओ ‘भारत आर्मी’ने ट्विट केला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पाहजीला डाव ३०० धावांत संपला. पहिल्या डावात कुलदीपने उत्तम गोलंदाजी केली. उस्मान ख्वाजा (२७), ट्रेव्हिस हेड (२०), कर्णधार टीम पेन (५), नॅथन लॉयन (०) आणि जॉश हेजलवूड (२१) असे ५ बळी टिपले. सलामीवीर मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७९ धावा केल्या. फॉलो-ऑन दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६ धावा केल्या. पण त्यानंतर चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ अंधुक प्रकाशामुळे रद्द करण्यात आला.