पर्थ कसोटी सामन्यात विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात झालेल्या वादानंतर, कोहलीवर टीकेचा भडीमार करण्यात आला. विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक स्वभावावरुन अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. मात्र याचसोबत काही खेळाडू विराटच्या मदतीला धावूनही आले. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यादरम्यान शास्त्री यांनी विराट कोहलीची पाठराखण केली असून त्याच्या वागण्यातं समर्थनही केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : संघाचं हितं महत्वाचं, विक्रम नंतर करता येतात – अजिंक्य रहाणे

“एखादी विकेट गेल्यानंतर विराट नेहमी उत्साहात असतो. प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणणं त्याला आवडतं. त्याच्या वागणुकीत लोकांना काय चुकीचं वाटतं हे मला माहिती नाही. माझ्यासाठी विराट कोहली हा सज्जन माणूस आहे.” विराट कोहलीच्या मैदानातील आक्रमक स्वभावावर विचारलेल्या प्रश्नाला रवी शास्त्री यांनी उत्तर दिलं. रवी शास्त्रींनी केलेल्या पाठराखणीमुळे या प्रकरणावर आता पडदा टाकण्यात येईल अशी चिन्हं दिसत आहेत. दरम्यान, बीसीसीआयनेही या प्रकरणात विराट कोहलीला क्लिन चिट दिलेली आहे. ४ सामन्यांच्या मालिकेत सध्या भारत १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.