अॅडलेड कसोटी जिंकून मालिकेची दणक्यात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पर्थ कसोटीमध्ये चांगलाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी भारतावर मात करुन ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने केलेली संघनिवड ही चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. पर्थची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करणारी असेल म्हणून भारताने ४ जलदगती गोलंदाजांना संघात जागा दिली. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लॉयनने या खेळपट्टीवर आपली चांगलीच छाप पाडली. दुसऱ्या डावात ६ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीनेही भारतीय संघात एक फिरकीपटू असायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा धुर्त खेळ; टीम इंडियामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

शमी चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता. “अंतिम ११ जणांच्या संघाबद्दलचा निर्णय संघ व्यवस्थापन घेतं. त्यात आमचा काहीही संबंध येत नाही. आमच्या संघात एक फिरकीपटू होता, त्याने चांगली गोलंदाजीही केली. पण तुम्ही माझं मत विचाराल, तर संघात एका फिरकीपटूची गरज होती. पण या सर्व गोष्टी तुमच्या संघव्यवस्थापनावर अवलंबून असतात.” शमीने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं.

प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाचे गोलंदाज हे परदेशात चांगला मारा करत आहेत. सर्व गोलंदाज योग्य टप्प्यावर, योग्य दिशेत चेंडू टाकत आहेत. चार वर्षांपूर्वी आम्हाला असा मारा करणं कठीण जायचं. त्यामुळे हा बदल चांगला आहे आणि तो सर्वांच्या लक्षात आलाच असेल. शमीने आपल्या सहकारी गोलंदाजांचं कौतुक केलं. दुसरी कसोटी मालिका गमावल्यानंतर भारत सध्या १-१ ने बरोबरीत आहे, मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून त्याच्या जागेवर मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलंय. याचसोबत अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही संघात पुनरागमन केलंय. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला स्थान देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.