४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर असताना पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावांपर्यंत मजल मारली. पर्थची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करते, याचसाठी भारताने आश्विनला विश्रांती देत संघात आणखी एका जलदगती गोलंदाजाला स्थान दिलं. आश्विनला वगळून भारत ऑस्ट्रेलियाने लावलेल्या जाळ्यात फसल्याची प्रतिक्रीया कांगारुंचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने दिली आहे.

“पर्थची खेळपट्टी ही अधिक उसळी घेणारी आणि जलदगती गोलंदाजांना साथ देणारी असेल हे चित्र निर्माण करण्यात आलं होतं, त्याला भारतीय संघ फसला आहे.” आश्विनला वगळण्याचा निर्णय हा चुकीचा ठरत असल्याचंही मॅकग्राने स्पष्ट केलं. आपल्या संघात गोलंदाजीमध्ये वैविध्य असणं ही नेहमी चांगली गोष्ट असली जाते, मात्र या सामन्यात भारतीय संघाचा मारा हा एककल्ली वाटतो आहे. अखेरच्या सत्रामध्ये पर्थच्या मैदानावर फिरकीपटू चांगली कामगिरी करु शकले असते, अशी प्रतिक्रीया अॅलन बॉर्डर यांनी व्यक्त केली.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्ननेही मॅकग्रा आणि बॉर्डर यांची री ओढली. भारतीय संघाला आज रविंद्र जाडेजाला संघात स्थान द्यायला हवं होतं. “रविंद्र जाडेजा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. तो चांगला फलंदाज आहे, क्षेत्ररक्षणात तो उत्कृष्ट कामगिरी करतो आणि गोलंदाजीही चांगली करतो. जर ३ जलदगती गोलंदाजांच्या जोडीला जाडेजा संघात असता तर भारताच्या आक्रमणाला अधिक धार आली असती”, वॉर्नने आपलं मत मांडलं. आता उद्याच्या दिवशी भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.