ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारताने यजमान संघावर मात करत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. फलंदाजीमध्ये पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा, दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे-विराट कोहलीने दाखवलेली कमाल; आणि गोलंदाजीत इशांत-शमी-बुमराह आणि आश्विन या चौकडीने केलेला टिच्चून मारा या जोरावर भारताने ३१ धावांनी हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, विराटने आपल्या संघाने सामन्यात सर्वोत्तम खेळ केला त्यामुळे आपणच विजयाचे दावेदार असल्याचं म्हटलं.

भारताने दिलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलचं तंगवलं. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. “अखेरच्या दिवशी सामन्यात शांत राहून खेळ करणं गरजेचं होतं. कमिन्स मैदानात असेपर्यंत जरा धास्ती वाटत होती मात्र त्याला बाद केल्यानंतर आम्ही बाजी मारु हा आत्मविश्वास आम्हाला होता. म्हणूनच मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. एक चांगला चेंडू आम्हाला विजयाच्या जवळ नेईल याची मला खात्री होती. गोलंदाजांनी या सामन्यात २० बळी घेत आपली कामगिरी चोख बजावली आहे, त्यामुळे फलंदाज आपली जबाबदारी कशी पार पाडतात हे महत्वाचं होतं. रहाणे आणि पुजाराने दुसऱ्या डावात भागीदारी करुन माझा विश्वास सार्थ ठरवला.” यामुळेच आमचा संघ सामन्यात विजयाचा दावेदार होता, कोहलीने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

अवश्य वाचा – IND vs AUS : एका विजयाने टीम इंडिया समाधानी होणार नाही – विराट कोहली

यावेळी भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करण्याची गरजही कोहलीने बोलून दाखवली. आगामी पर्थ कसोटी सामन्यात या गोष्टींचा सामन्यावर प्रभाव पडू शकतो. सामन्याआधी प्रत्येक खेळाडूने घेतलेली कठोर मेहनत कामाला आली आहे. त्यामुळे फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही या विजयाचे भागीदार आहेत. पहिल्या डावात आम्हाला मिळालेली १५ धावांची आघाडी संघाचा विश्वास वाढवण्यासाठी पुरेशी होती असंही कोहलीने यावेळी स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : उस्मान ख्वाजा नंतर पॅट कमिन्स; ऋषभ पंतचं यष्टींमागून स्लेजिंग सुरुच